Wednesday, December 16, 2015

कोणीच नाही केली माझ्यावर कविता


 मित्रावर कविता केली तर तो फारसा नाही दाद देत
म्हणून तुम्ही करता मैत्रिणीवर कविता
तिच्यावर  कविता केली तर ती ठेवते सांभाळून स्वताजवळ
असा ठाम विश्वास तुमचा
पण फार कविता करू नका तिच्यावर
शेफारून जाईल ती
शंभर वेळा मोगले आझम बघणारा फक्त एखादाच असतो

काय करणार बरे तिच्यावर कविता?
तिच्या काळ्या काळ्या डोळ्यावर?
की तिच्या घनदाट केसांवर?
की तिच्या गाण्यावर?
की तिला पावसात भिजताना बघून?
पण नका सांगू तिला प्रत्येक कविता तिच्यावर
वरचेच वाक्य पुन्हा वापरून बघा

दररोज गोड गोड खाणे रुचेल का तुम्हाला
कधीतरी मित्रावर पण कविता करीत जाकी
कोणीच नाही केली माझ्यावर कविता
तिने देखील
शप्पत....


प्रकाश

हरवून गेलेले घर

 आई म्हणजे घर असतं
कसका असेना आपलं असतं

आपल्यासाठी मोकळं असं मैदान असतं
हिरवं हिरवं कुरण असतं
जिथे नसतेच कसली चिंता, काळजी
आई असते उबदार गोधडी
आई वृक्षाची घनदाट सावली
तिच्या उबेत सुखाने झोपत असतो
स्वप्नातल्या फुलपाखरांशी खेळत असतो
 मी आपला मस्त वांड उनाड
चौफेर उधळायचो वारू होऊन
पाखरे परतात तिन्ही सांजेला आपल्या झाडाकडे परततसा मी पण परतत होतो
 म्हणायची ती,कसे होईल ह्याचे मी गेल्यावर
कसा सांभाळेल हा पैसा, कसा करेल हा संसारशप्पत ,गेलीच आई एके दिवशी
आणि घर गेले हरवून
 तेव्हा पासून
मी वणवण फिरतो आहे घराशिवाय, झाडाशिवाय
मी आपला फिरतो आहे
सतत आठवणीत असते घर
नेहमीच नाही पण कधीतरी
स्वप्नात देखील येते घर
कधी मला झाड दिसले की मला माझेच वाटते घरजवळ गेलो की हरवून जाते
शप्पत
घर देखील मृगजळासारखं
बघता बघता हरवून जातं  ...?


प्रकाश

Tuesday, May 26, 2015

गरीब..!!


 गरीब होतो तरी नव्हतो वाटत कधीच गरीब
गरीबितही शप्पत श्रीमंत वाटत होतो
नव्हताच वाटत  कुणा श्रीमंत पोराचा हेवा
तो त्याच्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने जात होतो
अंगात शप्पत भीमाची ताकद होती
मी बघत होतो माझ्या चतकोर तुकड्यातील  शेताची श्रीमंती 
कधी मिरच्या कोथिम्बिर
रोपट्याला लागलेली काटेरी वांगी आणि तमाटे देखील
मागील अंगणातील विहिरीजवळ आंघोळी करीत होतो
घर होते जुने मातीच्या धाब्याचे
उन्हाळ्यात धाब्यावर झोपल्यावर आभाळ बघत होतो
किती छान दिसायचे बालपणीचे आभाळ, मुठीत येत होते
चंद्र चांदण्याची रंगलेली मैफल बघत होतो
भुताच्याही  गोष्टी अंधारात निघत होत्या
आणि झाडावरून घुबडाचा चिक्तारही ऐकू येत होता
भीत तर होतो
भीत होतो भुताला, अभ्यासाला, मास्तराच्या छडीला देखील
तरी शेवटी पास होत होतो
पास झालोना एवढे फक्त पुरे होते
मन आनंदाने गायला तेवढे खूप होते 
शप्पत
गरीब असलो तरी गरीबितही  श्रीमंत होतो  
फुसक्या फटाक्याची देखील सुरसुरी करीत होतो
आजूबाजूचा सगळाच अंधार क्षणभर दूर लोटीत होतो
फटाक्याचा वास शप्पत अत्तर होऊन यायचा
चंद्राचा आकाश कंदील अंगणात झुलायचा
श्रीमंती  म्हणजे काय हे माहितच नव्हते
आणि गरिबी सुद्धा काय हे शप्पत काही कळत नव्हते
जे जगतो त्यात आनंद होता
गरीब होतो तरी मन श्रीमंत होते


प्रकाश